Saturday, August 11, 2012

लेनिनबाबा

लेनिनबाबा ....
तुझ्या बद्दल अजिबात वाचलेलं नाही
नाही म्हणायला कॉलेजात ऐकलंय म्हणा थोडं थोडं
अन्  'लिहितोय वेडा' म्हणून मला हसू बिसू नको
तुझ्या हसण्याचे दिवस सरलेत केव्हाच.

एक बाई तुझा इतिहास तावातावानं शिकवीत होती
लाल चौकात तुझ्या पुतळ्याखाली तरुण पोरं नाचत होती
कॉलेजातल्या इतिहासात तु आजही भले हीरो असशील
रशियातला वर्तमान तुला तुडवतोय
त्याचं काय ?

सारं जग साम्यवादी करण्याची
स्वप्न पाहणारी मंडळी.
तियानमेन चौकातले तांडव
तुमच्या लालभाईंचीच मर्दुमकी
होय ना ?

भांडवलशाही विरुद्ध तुमच्या नावानं
इथेही उठलेत कैक आवाज.
तिकडं पाऊस पडला म्हणून
छत्र्या उघडल्या गेल्या इथंही
पण साम्यवादी भांडवलदारांची
बोली बदलते आहे आज!
लेनिन मार्क्सच्या जागी विवेकानंद बसवले जाताय
त्याचं काय ?

लेनिनबाबा,
राजसत्ता उलथवणं तितकं कठीण नाही
नाही कठीण पोतंभर पुस्तकांच्या भेंडोळ्या लिहिता येणं
इथं माणूस बदलवता बदलवता
माणसातल्या 'बर्लिन भिंती' विरघळताय
रोजच्या रोज....
इथं माणसातलं राष्ट्र जागवता जागवता
कित्येकांचा कापूर होतोय
रोजच्या रोज....

                   ---विवेक राम कवठेकर




आनंदयात्री-रवीन्द्रनाथ

"राष्ट्राचे आणि मानवाचे आदर्श उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या वज्रदन्डावर आपल्या वाणीचा ध्वज केला, आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची स्वप्ने चितारली आणि त्यांतून विश्वशांतीचे परमचक्र फिरते ठेवले."

"अमर आनंदाकडे, अपार आनंदाकडे जाणाऱ्या यात्रीला ही अशीच वाट चालावी लागते. पण त्यांच्या रक्तबंबाळ पावलांच्या ठशागणिक मंगलाची चिरसुंदर रक्तकमळे उमललेली असतात आणि त्यांतूनच युगांच्या चैतन्याचा सुगंध दरवळत असतो."

"जीवनात एका सश्रद्ध प्राणशक्तीपुढे बाकी सर्व शक्ती कःपदार्थ आहेत या विषयी ते निःशंक होते. त्यामुळे जेत्यांच्या शस्त्रास्त्रांची  किंवा कुटीलांच्या छद्मायुधांची तमा त्यांना कधीच वाटली नाही. राष्ट्राच्या आदर्शाचे आपण रखवालदार आहोत, मानवाच्या स्वप्नाचे किमयागार आहोत आणि त्याच्या भवितव्याचे शिल्पकार आहोत असा अभंग आत्मविश्वास घेऊन ते आले होते. आपण ईश्वराचे लाडके आहोत आणि त्याने या महान कामगिरीवर आपली योजना केली आहे हे त्यांनी प्रतिभेच्या पहिल्याच साक्षात्कारात ओळखले होते. पण त्यासाठी ईश्वरदत्त प्रतिभेवर विसंबून चालणार नाही. आपल्याला आपल्या जीवनाचीच यज्ञवेदी करावी लागेल आणि त्यात हवीही आपण आणि ज्वालाही आपणच याचा प्रत्यय क्षणोक्षणी घ्यावा लागेल हेहि त्यांनी ओळखले होते. हे भान क्षणभर सुटू न दिल्यामुळे त्यांना आपल्या जीवनाचे असे भव्य महाकाव्य बनवता आले."

" पण साधनेची असली ही सांगता त्यांना सुखासुखी लाभलेली नाही, त्यासाठी त्यांना रक्ताचे अश्रू गाळावे किंवा गिळावे लागले आहेत. आपल्याच श्रद्धेचा दिवा करून अंधारात आणि वादळात काट्यांची वाट तुडवीत एकाकी चालावे लागले आहे. आज सारे जग त्यांचे कीर्तिगान गात आहे, त्यांच्या शतसांवत्सरिकीचा महोत्सव साजरा करीत आहे. पण त्यांच्या वाट्याला अपार अवहेलना आली होती. त्यांनाही एकाकी चालावे लागले होते. मनुष्य स्वभावाला धरून त्यांच्याही काळजाचा थरकाप झाला.  पण ते हताश झाले नाहीत. त्यांची श्रद्धा ढळली नाही. नक्षत्रांवरचे त्यांचे लक्ष हुकले नाही. त्या नक्षत्रावर आणि त्या श्रद्धेवर विसंबून ते स्वतःला धीर देत राहिले. आपल्याच बरगडीची वज्रशलाका करून एकटेच एकटे चालत राहिले. असतातून सताकडे, तमसातून ज्योतीकडे, मृत्यूतून अमृताकडे."

                               "आनंदयात्री  रविंद्रनाथ"--- बा.भ.बोरकर.

   

Friday, August 10, 2012

राजाशिवछत्रपती

महाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मने पेटवून उठविली महाराजांनीच. ज्वालामुखीच्या बळाने सह्याद्रीही खवळून उठला अन् साडेतीनशे वर्षे इथे कोंदलेला कभिन्न अंधार संपला. गुलामगिरी संपली, वर्मावरच्या वेदना संपल्या. संतसज्जनांचे मायबहिणींचे आणि या भूमीचे सारे अपमान धुवून निघाले.

महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून क्रांतीचा हलकल्लोळ केला. येथे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले. रायगडावर सार्वभौम सिंहासन छत्रचामरांसकट प्रकटले. चार पातशाह्या दबावून राजे छत्रपति झाले. गोष्ट सामान्य न जाहली. अपरंपार प्रेम करावयास आणि हक्काने रुसावयास लोकांस जागा निर्माण झाली.

महाराजांनी सामान्य जनांना सांगाती घेऊन असामान्य इतिहास निर्माण केला. अपार कष्टातून आणि असामान्य त्यागातून हा इतिहास उगवला, फुलला. इतिहास नेहमीच उगवतो रक्ताच्या थेंबातून, अन् फुलतो घामाच्या थेंबातून; अत्तराच्या वा गुलाबपाण्याच्या थेंबातून नव्हे.

महाराजांनी अभेद्य गडकोट निर्माण केले. अजिंक्य आरमार निर्माण केले. तुडुंब भरलेली धान्य कोठारे अन् अपार द्रव्याची भांडारे निर्माण केली. अजिंक्य तोफाही निर्माण केल्या. पण त्यांनी निर्माण केली सर्वात अवघड परंतु सर्वात आवश्यक अशी गोष्ट. कोणती ? त्यांनी अजिंक्य मनाची माणसे निर्माण केली. अजिंक्य मनाची माणसे निर्माण झाली की अवघे राष्ट्रच अजिंक्य बनते.

छत्रपति  शिवराय म्हणजे जागत्या राजकारणाचा, प्रखर स्वाभिमानाचा, डोळस, श्रद्धेचा, उदात्त संस्कृतीचा, कठोर व्यवहारदक्षतेचा, अचूक नेतृत्वाचा, राष्ट्रीय चारित्र्याचा आणि पार्थ पराक्रमाचा मूर्तिमंत साक्षात्कार. शिवचरित्र म्हणजे सिद्ध झालेले राष्ट्र उभारणीचे तत्त्वज्ञान.

या तत्त्वज्ञानाचे  आणि इतिहासाचे आम्ही औरस वारस. त्या इतिहासास, तत्त्वज्ञानास, सिंहासनास आणि सिंहासनाधीश्वर क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपती महाराजांस आमचा त्रिवार मुजरा !

     

अंतरा

पुढे चालण्याचा तुला रोज चाळा
उराशी धरोनी नवी स्पंदने
नवी स्वप्नभूमी, नवे गीत गाणे
स्थायीतुनी अंतर लावणे !

मला छंद भारी जुन्या खेळण्याचा
कशी मी स्मृतींची जपू बाहुली
सदा वेड  येथे उन्हे  पेलण्याचे
तुझा छंद शोधे नवी सावली !

तुझ्या चालण्याला कधी अंत नाही
फुटावे उरी हे असे धावणे
तुला ओढ स्थायीतुनी अंतऱ्याची
मला मंद्रसप्तीच मंदावणे !

                 ---कृष्णा चौधरी

Thursday, August 9, 2012

पोखरण- १९९८

तिसरा डोळा आम्ही नुसता किलकिला केला,
तर डळमळून गेले अवघे भूमंडळ.
सत्तांध गिधाडांनी केवढा थयथयाट केला
जसे कांही घडूनच गेले भयानक अमंगळ !

त्यांना वाटते, कराल पंजाखाली आम्ही निमूट जगावे
फेकलेल्या चार तुकड्यांपुढे व्हावे कणाहीन लाचार.
अवतीभवतीची कोल्ही कुत्री भुंकतांना
भिऊन करावा आम्ही त्यांना बेशरम नमस्कार !

त्या धनदांडग्यांनी धमकी दिली आहे आता
आमचे रस्ते रोखण्याची प्रगतीसूर्य  झाकण्याची.
हे जसे काही साळसूद रुद्राक्षांची जपमाळ ओढणारे
त्यांच्या भात्याला जणू रास नाजूक फुलांची !

लक्षात असू द्या,
इतिहासाने खूप शिकविले आहे.
गुढघे टेकून कुणाचेही भले होत नसते.
भीक घालीत नाही कुणी भेकडांच्या अहिंसेला.

लक्षात असू द्या,
गंगायामुनेच्या अथक प्रवाहामधून
आमच्या सहिष्णुतेचे वाहतेय शीतल जिवंत पाणी
तरीहि  शांत रक्तामधून सळसळते आहे
कुरुक्षेत्रावरच्या श्रीकृष्णाची न्यायनिष्ठूर वाणी.

आपापसात असतील मतभेद तरी एक होऊ
समर्थ राष्ट्रासाठी आम्ही समर्पणसिद्ध होऊ
विश्वकल्याणाचे पसायदान तर
आम्हीच मागितले आहे
नाठाळासाठी तुकोबाची काठी
आम्हीच होऊ !

अनुभव- अनुभूती- काव्यानुभूती

गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो. ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव सर्वसामान्यांचा असतो. त्या अनुभवांमध्ये काहीतरी सौंदर्याच्या रहस्याची जाणीव होणे हे अनुभूतीचे कार्य आहे. कदाचित तिथूनच कवितेचा प्रांत सुरू होत असावा. आणि ज्या वेळी कवितेच्या अनुभवाचे परमोच्च असे स्थळ किंवा पाझरणीचे जालतीर्थ आपल्याला गवसते त्याला आपण सौन्दर्यानुभूती म्हणतो. अनुभवांपासून प्रारंभ केला पण तिथेच थांबलात तर कवितेचे कोणतेच रहस्य आपल्याला कधीच उलगडू शकणार नाही. आणि तिथून हे आम्हाला समजत नाही, ते आम्हाला समजत नाही, अशा गोष्टी आपण ऐकतो. सौन्दर्यानुभूतीचा  अर्थ शोधण्याची प्रक्रिया अनुभवाचा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेपेक्षा संपूर्णपणे भिन्न असल्याने अनुभवाच्या अनुभूतीचे, सौंदर्याचे तुमचे जे काही निकष असतील ते सौन्दर्यानुभूतीला लागू पडत नाहीत. अनुभवाच्या अनुभूतीचे निकष हे तात्कालिक व प्रचारकी असतात. उद्गारवाचक कविता, वक्तृत्वपूर्ण कविता ही संमेलनातील टाळीच्या अपेक्षेने उसळणारी कविता आहे. तिला हे निकष तंतोतंत लागू होतात.
                                                                                     
                                                                                                     ---    कवी ग्रेस.

Wednesday, August 8, 2012

ज्यांचीबागफुलूनआली

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत.
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी गावीत.

सूर्यकुळाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा प्रकाश द्यावा.
प्राक्तनाचा अंधार तिथे
प्रकाशाचा गांव न्यावा.

मन थोडे ओले करून
हिरवे हिरवे उगवून यावे
मन थोडे रसाळ करून
आतून मधुर मधुर व्हावे.

ज्यांच्या अंगणात ढग झुकले
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे.

आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
ज्यांचे जन्म मातीत मळले
त्यांना उचलून वरती घ्यावे.

                      --दत्ता हलसगीकर