Sunday, January 26, 2014

आई


आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं
एक गाव असतं !

                  सर्वांत असते
                  तेव्हा
                  जाणवत नाही
                  आता नसली
                  कुठंच
                  तरीही
                  नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते
पालं उठतात
पोरक्या
जमिनीत
उमाळे
दाटतात 
आई मनामनात
तशीच
जाते ठेवून काही
जीवाचं जिवालाच 
कलावं
असं
देऊन जाते काही

आई असतो
एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा

घर उजळतं
तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली
अंधारात
की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान!

पिकं  येतात
जातात
माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही
तहान
दिसत काहीच नसलं
डोळ्यांना 
तरी
खोदत गेलो
खोल खोल
की
सापडतेच अंतःकरणातली
खाण
याहून का निराळी
असते आई ?

ती घरात नाही
तर मग
कुणाशी बोलतात
गोठ्यात
हम्बरणाऱ्या गायी ?

आई खरंच
काय असते ?
लेकराची
माय असते
वासराची
गाय असते
दुधाची
साय असते
लंगड्याचा
पाय असते
धरणीची
ठाय असते !

आई असते
जन्माची शिदोरी
सरतही नाही
उरतही नाही !
आई एक
नाव असतं
नसते तेव्हा
घरातल्या घरात
गल्बललेल गाव असतं !

- फ. मुं. शिंदे.

Thursday, January 16, 2014

उन्हा सारखा हर्ष माझा असावा

उन्हा सारखा हर्ष माझा असावा, घरातून बाहेर यावी मुले
नभा सारखा शोक माझा असावा, तृणातून देखील यावी फुले.

जळा सारखी तृप्ती माझी असावी, स्त्रियांनी कडेचे भरावे घडे
उषे सारखी दीप्ती माझी असावी, फुलावे भविष्यातले केवडे.

भुई सारखी प्रीती माझी असावी, खणी त्याजलाही फुटवे झरे
निशे सारखी शांती माझी असावी, कुशीला विसाव्यास यावी घरे.

तरीही नसावे असोनी जगी ह्या, निरालंब छांदिष्ट वाऱ्यापरी
कळे ना कुणाला कसा पार झालो, भूलावून लोकांस पाऱ्यापरी.

    -बा.भ.बोरकर.

Friday, January 3, 2014

आयुष्याची परिपूर्णता

आयुष्याची परिपूर्णता  


आज म्हटले, आयुष्य विणायला घेऊ या, जमतंय का ते बघू या.
वाटले अगदी सोपं असेल, रंग संगती जमून आली कि आयुष्य ही सुंदर दिसेल.

प्रश्न पडला धागे कोण कोणते घ्यायचे? एक दोनच कि सगळेच वापरायचे?
मग ठरविले फक्त छान छानच धागे घेऊ, एक दोनच काय? सगळेच एकमेकात विणू.

सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम.
म्हटले छान आहे हा धागा, धाग्याने वीण ही राहील कायम.

मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बर्याच भरल्या जागा.
थोडे थोडे आयुष्य आकार घेऊ लागले, पण अजूनही बरेचसे विणायचे बाकी राहिले.

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला, प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंतत गेला.
हळू हळू वीण घट्ट होत होती, तरी देखील कसली तरी कमी मात्र होती.

मग घेतला एक नाजुक धागा प्रेमाचा, धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्यांनी त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.

एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा,
 त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला.

सगळेच धागे छान सुंदर आणि प्रसन्न होते
तरी देखील त्यांच्यातल्या एक सारखेपणामुळे मन मात्र खिन्न होते.

थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच,
 म्हटले बघू या तरी यांच्यामुळे आयुष्य होतंय का सुरेख.

मग घेतला एक धागा दुःखाचा, एक निराशेचा,एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा.
हे चार धागे विणता एकमेकांमध्ये, आयुष्यालात्यांच्यामुळे खरा अर्थ लाभला.

अपयशाशिवाय यश नाही, दुःखाशिवाय सुख नाही
पराजायाशिवाय जय नाही आणि निराशेशिवाय अशा नाही.

महत्व पटले आहे सर्व धाग्यांचे आज मला,
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त आयुष्याला मजा नसते.

सध्या सुध्या लोकरीच्या विणकामात ही रंगसंगती लागतेच.
मग आयुष्य विन्तांनाच का आपल्याला भीती वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणूनच एक परिपूर्ण आयुष्य बनते.
कुठ्लाध्गा कुठे,कसा वापरायचा हे मात्र ज्याचे त्याच्यावरच असते.