Wednesday, March 27, 2013

ऋतु हिरवा

ऋतु हिरवा


डोळ्यावरल्या गांधारीच्या
सतीत्व पट्ट्या सोड
काया न तुझी गौररुपाची
सर्वांगाला कोड.||१||

वटवृक्षांच्या पारंब्यासम
ध्यानस्थाचे सोंग
प्रपंचून घे दुःखे सारी
संसार नसे हे ढोंग ||२||

जळी, तळी, विहिरीकाठी
पाण्याचे संचित नसते
झर झर झरता झरता 
गंगा भगीरथ होते ||३||

पडीत राहून वांझ महीची
विरागिनीची  दैना
फाळामधुनी फुटुनि येता
सुखास जातो महिना ||४||

वणवणतांना रानामधुनि
पायी खुडु दे काटा
रक्त सांडता खाली थोडे
ऋतुहिरव्या होतील वाटा ||५||

--गजेश तोंडरे 

घर असावे घरासारखे


घर असावे घरासारखे 
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा 
नकोत नुसती नाती ||

या शब्दांना अर्थ असावा 
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी ||

त्या अर्थाला अर्थ असावा 
नकोत नुसती नाणी
अश्रुतूनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी ||

या घरट्यातुन पिलु उडावे
दिव्य घेउनी शक्ती 
आकांक्षांचे पंख असावे 
उंबरठ्यावर भक्ती || 

भिऊन पावलं टाकू नका

भिऊन पावलं टाकू नका 
भिऊन डोळे झाकू नका

भिणाऱ्याला
प्रकाश कोणी बघू देत नाहीत.
भिणाऱ्याला
इथे कोणी जगू देत नाहीत.

गरुडाहून झेपावणारा 
प्रत्येकाला प्राण आहे.
विश्वास ठेवा तुमच्या पायात 
न संपणारं त्राण आहे.



हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजा 
हे हिंदु तपस्यापूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||धृ||

करि हिंदुराष्ट्र हे तू ते - वंदना
करि अंतःकरण तुज - अभिनंदना
तव चरणि भक्तिच्या चर्वी - चंदना
गूढाशी पुरवी त्या न कथू शकतो ज्या ||१||

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पाच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पददली तुडवी
ती शुद्धि हे तुझ्या कर्मी - राहू दे
ती बुद्धि भाबड्या जीवा - लाहू दे
ती शक्ति शोणितामाजी - वाहू दे
तो मंत्र पुन्हा तो दिला समर्थे तुज ज्या ||२||

मराठी मायबोली


मराठी असे आमुची मायबोली 
जरी आज ती राष्ट्र भाषा नसे,
नसे बाह्य ऐश्वर्य या माऊलीला,
यशाची पुढे थोर आशा असे.

न मातब्बरी पंचखंडांतरी ती 
जरी मान्यता पावली इंग्रजी 
भिकारीण आई जहाली म्हणूनी 
कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी.

जरी मान्यता आज हिंदीस देई 
उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी 
दिलाचा मराठा मराठीस वंदी 
हिची जाणुनी योग्यता थोरवी.

असो दूर पेशावरी उत्तरी तो,
असो दख्खनी दूर तंजावरी
मराठीच माझी म्हणे मायबोली
प्रतिष्ठापुनी मूर्ति अभ्यंतरी!

मराठी असे आमुची मायबोली 
जरी भिन्नधर्मानुयायी असू,
सहिष्णुत्व अंगी पुरे बाणलेले
हिच्या एक ताटात आम्ही बसू.

हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू ,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे,
हिला बैसवू वैभवाचे शिरी!

--माधव ज्युलियन 

दिवा असाच राहु दे

दिवा असाच राहु दे


दिवा असाच राहु दे तुला निवांत पाहु दे
तपःश्रियेत गे तुझ्या मला उदंड न्हाऊ दे

व्यथा पिकून गे तुझ्या मुखी सुखे विसावल्या 
कथा बनून कोवळ्या रसावुनी  मुसावल्या 

ऋतू सहाहि ढाळिती किती नव्या नव्या कळा
जरेत आगळ्या तुझ्या अपूर्व गंधसोहळा!

कधी कधी मनास ये उदास एकटेपणा 
चराचरीहि जाणवे जुनाट तोच तो  पणा

चुकून ये कुणीतरी मुलेही दूर पांगली 
दुरावलीत माणसे जरी मुळात चांगली

असह्य एकटेपणी तुझीच ओढ लागते
पुनश्च मर्गळीतही प्रसन्न ज्योत जागते

तुझीच साथ राहिली भरून जीव लाहु दे
सरून रात्र जाऊ दे पुन्हा पहाट होऊ दे

--बा.भ.बोरकर 


सती

सती


काळीज पिळावे कोणी 
करुणेचा यावा सूर
पेटली उभी अविनाशी
अंगांगी कर्पूरगौर

हे ललाट अपसूक झुकले
झगमगला भूषणभोग
जोगवा नवा मागे तो 
गुणसुंदर कृष्णपराग

मनमंयार भलत्यावेळी
झेलता सुखाचे झेले
ताऱ्यांचे नुपूर विदेही
लोचनी दीप झालेले

वल्कले गळाला देह
लावण्य सतीची आग 
यातियोगे अवचित लाभे
दुःखाचा संतविराग

--शिवा राऊत



प्रार्थना

प्रार्थना


तू करुणाकर, तूच चराचर 
व्यापुनी उरला दशांगुळे
तू अविनाशी, विघ्नविनाशी
तू तेजाची सूर्यकुळे!

कृष्ण घनांतुन तुझीच नुपुरे
पाऊसकाळी छुमछुमती
मातीमधुनी तुझ्या रुपाची
रोपे हासत अवतरती!

तूच जिवाच्या गाभाऱ्यातील 
निजबोधाची निरांजने
भवतापातून तूच काढिसी 
त्रिगुण युतीची दास मनें!

तूच निवारा अमृतधारा
परीसस्पर्श तू आत्मसखा
तूच माउली, मोक्षसावली
तुझी दर्शने देत सुखा!

--शिवा राऊत

Sunday, March 24, 2013

कणा

कणा


लाभो वेदनेला, विश्वत्वाचा खांब
मानव्याचा कोंब, वाढो आता!

भेटे त्याचे खेटे, आकांताच्या वाटी
अंधाराची मिठी सैल व्हावी !

डबाबंद दुःख, खुजे हे आकाश 
नको परितोष, क्षुद्रत्वाचा!

देशी तर दे बा, 'सत्य' नारायणा 
समस्तांचा कणा, ताठ राहो!

-प्रमोद अणेराव   

व्रत

व्रत


जगायचे जर असेल तर, मग
गळ्यात गाणे हवे
रंग पराभूत स्वप्नांनाही 
देता यावे नवे....

रक्त संपल्या हातांनाही 
वळता याव्या मुठी
अभेद्य अंधाराला देखील 
असतील कोठे फटी....

जगणे तितके खोल असावे 
दुःख जेवढे जुने
ओठ दाबुनी हसतील त्यांची 
फुलतील श्रावण उन्हे.

सहवासाला सुगंध येईल 
उरांत जपता कळी
अन् स्वातीचे घडेल वैभव 
डोळ्यांमधल्या जळी.

जरी दुःखाचा गर्भवारसा
तरी जगावे असे
अपुल्या दुःखांसोबत  घ्यावे 
इतरांचे ही वसे.

-प्रसन्न शेंबेकर    

आई

आई


जात्यावारती दळता दळता सूर भरविले मला
मुसळाने तू कांडण केले आणि घडविले मला...

मला चढवता घाट सुखाचा कोसळली कैकदा
कधी मनाचे खचले गोपुर पण सावरली पुन्हा
दरी कपारी ठेचाळत तू उंच उचलले मला...

तू माझ्या कोरड्या बनाला दिला सुगीचा थवा
अंधाराच्या कुशीत झाली माझ्यासाठी दिवा
वळणावळणावर जखमांच्या तूच हसविले मला...

अजूनही आठवतो-'गळक्या खोप्यामधला झुला'
अणु-रेणूच्या या तुकड्याला किती लावला लळा!
जणूं मांडीवर कृष्ण निजावा तसे झुलविले मला...
-बबन सराडकर
त.भा.दि.-९८ 

लुगडं

लुगडं


कशी फुटली कपाशी हसे चांदणं दुपारी
वेचतांना वेळ नाही खांड खायला सुपारी!

भुतासारखं वेचून शिणले ना नखं बोटं 
सायंकाळी मोजणार दांडी मारणार नीट!

ढीग डोंगरा एवढा किती सांगायच्या खंडी?
फेस यायचा बैलास ओढतांना गाडी बंडी!

भिजे दुधाच्या धारेत शुभ्र पांढरा कापूस
मऊ सुताचं लुगडं नेसू जीवास उल्हास.

कर्जपाणी फिटायचं उरल्याचं तेलमीठ
जाय वर्षावर पुन्हा नव्या लुगड्याची गोठ.

आता दांडीच्या नेसूला पुन्हा मारायची गाठ
मेला कापूस हिणवी शुभ्र विचकून दात.

-विठ्ठल वाघ 
त.भा.दि.-९८