Wednesday, May 2, 2012

लावण्य रेखा

लावण्य रेखा


देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे व सावळे ह्या मोल नाही फारसे
तेच डोके देखणे जे कोंडीते साऱ्या नभा
वोळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फांके शुभ्र पाऱ्यासारखे
देखणा देहांत तो हा सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

-बा.भ. बोरकर





1 comment:

  1. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे....


    देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके!!!!
    Bakibaab nehemee pramanech sarvottam.....
    Kahi Datta Halsagikaranchi nirmeetihee takavi!!!

    ReplyDelete